Jalna News : एसटी प्रवासात स्मार्ट कार्डसाठी सक्ती नको, आधार कार्ड ग्राह्य धरावे file photo
जालना

Jalna News : एसटी प्रवासात स्मार्ट कार्डसाठी सक्ती नको, आधार कार्ड ग्राह्य धरावे

शिवसेना उबाठाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Smart Cards Should Not Be Mandatory for ST Travel; Aadhaar Cards Should Be Accepted.

जालना, पुढारी वृत्तसेवा : १२ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी एसटी प्रवासात स्मार्ट कार्ड सक्तीबाबत पुनर्विचार करुन आधार कार्ड वापरण्यात यावे नसता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिवेसना जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हाप्रमुख महेश नळगे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, हनुमान धांडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे, शहरप्रमुख दिपक रननवरे, महेश पुरोहित, अनिस पठाण, दिनेश काकडे, सुरेश राणा, परमेश्वर मात्रे, अंकुशराव वाघ, फेजान मिर्झा यांच्यासह शिवसैनिकांची यावेळी उपस्थिती होती.

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत महिलांसाठी प्रवास सवलतीसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. ही योजना स्तुत्य असली तरी १२ ते ६५ वयोगटातील सर्व महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्याबाबत व्यावहारिक अडचणी निर्माण होत आहेत.

ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया व केंद्रांपर्यंत पोहोचणे हे अनेकदा कठीण ठरते. तसेच, तांत्रिक अडचणी, नेटवर्क समस्या आणि कार्ड हरवणे यामुळे प्रवासात अडथळे निर्माण होतात. अनेक महिला दैनंदिन मजुरी करणाऱ्या असल्याने त्यांना वेळ काढणेही कठीण जाते.

ओळखपत्राच्या आधारे सवलतीचा लाभ मिळण्याची सुविधा सुरु ठेवावी. ग्रामीण भागात अधिक नोंदणी केंद्रे व सोपी प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. आपण या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन महिलांना सोयीस्कर व सुलभ अशी व्यवस्था उपलब्ध करून द्याल, अशी अपेक्षा आहे.

महिलांकडे आधार कार्ड असल्याकारणाने त्यांना महिला असल्याचा पुरावा हा ग्राह्य धरण्यात यावा. स्मार्ट कार्डसाठी महिलांकडून २०० ते २५० रुपये वसूल करण्यात येऊ नये. याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करावा नसता शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी राहिल.

आंदोलनाचा इशारा

महिलांसाठी एसटी प्रवासात स्मार्ट कार्ड सक्तीबाबत पुनर्विचार करून आधार कार्ड वापरण्यात यावा नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उबाठाच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT