सागर देशमुख
पारध : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका गावात तरुणीवर दीर्घकाळ अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी (नाव गुप्त) अल्पवयीन असताना शेजारी राहणाऱ्या विवाहित आरोपीने तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “फोटो व्हायरल करण्याची धमकी” देत आरोपीने तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करत वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
पीडितेच्या कुटुंबाने राहते ठिकाण बदलले तरी आरोपीने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. 2018 साली आरोपीने तिला जबरदस्तीने एका ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतरही आरोपी सतत धमक्या देत व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडत होता.
दरम्यान, आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांनीही पीडितेला त्यांच्या घरी बोलावून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे समोर आले आहे. “हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकार” करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तिला बुरखा परिधान करण्यासही भाग पाडण्यात आल्याचे नमूद आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असून विरोध केल्यास जीवे मारण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. मार्च 2026 मध्येही आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन मारहाण करत बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे.
या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने अखेर कुटुंबियांसह धाडस करून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.