पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ही परिसरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे येथील परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करतात. एप्रिल महिन्यात शिमला मिरची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
शिमला मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. लवकर उत्पादन येऊन पेरणीसाठी काही पैसे हाती येतील, या अपेक्षेने शेतकरी शिमला मिरचीवर मेहनत करतात. मात्र यावर्षी हवामान बदल आणि अतिरिक्त आवकमुळे बहुतांश शेतकऱ्यांची शिमला मिरची खराब झाली आहे.
जी शिल्लक आहे तीही विकायला बाजारात नेली असता भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पिंपळगाव रेणुकाई बाजारात शिमला मिरचीला केवळ १५ ते २० रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. मजुरी, वाहतूक आणि औषधांचा खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी खराब झालेली मिरची रस्त्यावर फेकून दिली आहे.
मिळेल त्या भावात विक्री केली तरी पदरमोड होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने याची तातडीने दखल घेऊन शिमला मिरचीला हमीभाव द्यावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
उपटून फेकली
सध्या मिरची मुंबई, नागपूर, मध्य प्रदेश, तेलंगाना, हैदराबाद, आंध्र प्रदेश आदी ठिकाणी विक्रीसाठी जात आहे. दोन एकर मिरची लागवड केली होती. त्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च झाला आहे. काही मिरची खराब झाल्याने उपटून टाकली आहे. सध्या सिमला मिरचीला भाव नसल्याकारणाने खर्चही निर्णय अवघड झाला आहे.
- दीपक देशमुख, शेतकरी पिंपळगाव रेणुकाई