Self-enumeration campaign begins in Partur
परतूर, पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करणाऱ्या आणि राष्ट्रनियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या १६ व्या जनगणनेचा बिगुल वाजला असून, यंदाची जनगणना ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल १५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण जनगणना प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तथा जनगणना चार्ज अधिकारी दामोदर जाधव यांनी दिली.
यावेळी जनगणनेत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरता येणार असल्याने ही प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाली आहे. नागरिकांनी प्रगणकांच्या भेटीची वाट न पाहता १ मे ते १५ मे या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वयं-गणना पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या स्वयं-गणना प्रक्रियेत नागरिकांना एकूण १ ते ३४ प्रश्नांची माहिती भरावयाची असून, त्यामध्ये कुटुंबातील सदस्य संख्या, शैक्षणिक माहिती, व्यवसाय, निवासस्थान, मूलभूत सुविधा आदी बाबींचा समावेश आहे. नागरिकांनी अचूक व सत्य माहिती नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक माहिती भरल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर स्वयं-गणना आयडी प्राप्त होणार आहे. भविष्यातील पडताळणीसाठी हा आयडी जतन करून ठेवणे आवश्यक आहे. जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील नागकिांनी यात सहभागी होऊन जनगणा पुर्ण करण्याचे आवाहन केले.
जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या विकास आराखड्याचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, सुविधा नियोजन आणि भविष्यातील धोरणनिर्मितीसाठी अचूक माहिती अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवून स्वयं-गणना मोहिमेत सहभागी व्हावे."-दामोदर जाधव, तहसीलदार