School News : जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या; विद्यार्थ्यांना दप्तराची प्रतीक्षा ! Pudhari File Photo
जालना

School News : जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या; विद्यार्थ्यांना दप्तराची प्रतीक्षा !

मोफत दप्तर वितरण करण्याची प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Schools in the district started; students are waiting for their school bags!

जालना, पुढारी वृत्तसेवाः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील इयत्ता १ ते ८ विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सत्रात मोफत दप्तर वितरण करण्याची घोषणा प्रशासनाने शासन आदेश निर्गमित करून केली होती. शैक्षणिक सत्र सुरु झाले असून, पालकांकडून दप्तर खरेदी करण्यापूर्वीच मोफत दप्तर वितरण करावे, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात प्राथमिक विभागाचे शिक्षक संचालक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यात म्हटले, की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि १३ फेब्रुवारी २०२६ या शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर (Free School Bag) देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या निर्णया नुसार राज्यातील एकूण ४१ लाख ४३ हजार ०५४ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने १६५ कोटी रुपयांच्या निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता दिली असून, या निधीतून दर्जेदार दप्तरांचा पुरवठा केला जाणार आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांना या संदर्भात ई-निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२०२६ - २७ या शैक्षणिक वर्षास सुरुवात १५ जुन पासून झालेली असून विद्यार्थी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थी पालकाकडून दप्तर घेण्यासाठी आग्रह धरत आहेत. या आग्रहानुसार पालकांनी दप्तर खरेदी केल्यानंतर मोफत दप्तर वितरीत केल्यास पालकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसू शकतो.

त्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांना तातडीने दप्तर वितरीत करण्याबाबत निर्देश द्यावेत अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री संतोष राजगुरू यांच्यासह श्री संजय हेरकर, अमोल तोंडे, संजय बागडी, रमेश गोलांडे, रविंद्र पांदे, बाबुसिंग राजपुत, अँड दिपक राजपुत यांनी निवेदनाद्वारे शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्याकडे केली आहे.

शासन निर्णयानुसार इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वितरीत केले जाणार आहे. तातडीने ई निविदा प्रक्रिया राबवून संचालक प्राथमिक, पुणे यांनी दप्तर वितरण बाबत कार्यवाही करणे अपेक्षित आहे. शैक्षणिक सत्रास सुरुवात झाल्याने विद्यार्थी पालकांकडे दप्तराचा आग्रह धरतात. पालकांनी दप्तर खरेदी करण्यापूर्वी शासनाकडून मोफत दप्तर वितरीत केल्यास पालकांना आर्थिक भुर्दंड पडणार नाही.
- संतोष राजगुरू, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT