School closure protest on December 5
जालना, पुढारी वृत्तसेवा : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय कृती समितीच्यावतीने विविध मागण्यासाठी ५ डिसेंबर रोजी "शाळा बंद" आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी मिसाळ यांना या बाबत शिक्षक संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
शिक्षक संघटनांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्राथमिक शिक्षकांना अनिवार्य करण्यासंबंधाने राज्य शासनाने शिक्षकांच्या संरक्षणार्थ भूमिका घेऊन न्याय द्यावा. कलम २३ मध्ये सुध-ारणा करण्यासह अधिसूचनेत दुरुस्ती होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून आवश्यक पावले तातडीने उचलण्यात यावीत, अनिवार्यतेच्या नावाखाली थांबविलेल्या पदोन्नती प्रक्रिया शीघ्र सुरु व्हावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत बहाल करावी, संचमान्यता शासन निर्णय १५ मार्च २०२४ तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद (समायोजित) करण्याचे धोरण रद्द करून बालकांच्या शिक्षणाची हेळसांड थांबवावी, सर्व विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, पूर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकांच्यासेवा प्रथम नियुक्तीपासून पेन्शनसह सर्व प्रयोजनासाठी ग्राह्य धराव्यात,
शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षक भरती पूर्वलक्षी प्रभावाने सुरु करावी, दैनंदिन अध्यापन कार्य प्रभावित करणारी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनास अडसर ठरणारी सह ऑनलाईन व ऑफलाईन कामे बंद करावी, राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरु करावी, ग्रामीण भागात सेवारत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी मुख्यालयी शासनाने निवासस्थाने बांधून द्यावीत. तोपर्यंत मुख्यालयी राहण्यासंबंधाने शिस्तभंगाची नावाखाली सक्ती करू नये,
नगर पालिका, महानगर पालिका प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथक गठीत करून वेतन व सर्व थकबाकीचा प्रश्न सोडवावा, आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करावे, पेसा क्षेत्रात प्राथमिक शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत कार्यरत कंत्राटी शिक्षकांच्या सेवा कायम ठेवाव्यात, शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या व शाळांतील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालय स्तरावर संघटनांच्या किमान त्रैमासिक नियमित बैठक आयोजित कराव्यात आदी मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
या आंदोलनात जालना जिल्ह्यातील सर्वं संघटना सहभागी होणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाचे निवेदन लक्ष्मण नेव्हल, मधुकर काकडे, उद्धव पवार, देवेंद्र बारगजे, उद्धव बिल्हारे, शिवाजी देवडे, सिद्धार्थ गजभिये, राजेश मुंगीपैठणकर, श्रीपाद रुपदे, अनंत मिटकरी, रमेश गोल्डे, कृष्णा वाघ, बाबासाहेब कडोस, विकास बनकर यांनी दिले.- महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जालना