Saving sweet lime orchards during a drought is difficult
जालना, पुढारी वृत्तसेवा : यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प असल्याने दुष्काळात मोसंबीच्या बागा वाचविणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सीएसएमएस कृषी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील यांनी केले आहे.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शनिवार (दि.५) आयोजित केलेल्या कृषी विज्ञान मंडळाच्या ३५१ व्या मासिक चर्चासत्र प्रसंगी "दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे व्यवस्थापन" या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. पाटील पुढे बोलताना म्हणाले की, एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी मराठवाड्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
या परिस्थितीत मेहनतीने वाढविलेल्या मोसंबी बागा जागविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एप्रिल मे महिन्यात प्रति झाड ६० ते ७० लिटर पाणी उपलब्ध असेल, त्यांनीच अंबिया बहार धरण्याचा विचार करावा. ज्यांच्या बागेत मृग बहाराची फळे आहेत, त्यांनी पुढील पंधरा दिवसात झाडावरील फळे काढून घ्यावीत आणि बागांना पूर्णपणे विश्रांती द्यावी. कारण उष्णता वाढली की संत्र्याचे मार्केट वाढते आणि संत्री बाजारात आली की मोसंबी मार्केट कमी होते.
खेत बचाओ अभियान कृषि विज्ञान मंडळाचे ३५१ वे मासिक चर्चासत्र वर्चासत्राचे विषय दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे व्यवस्थापन या परिस्थितीत बागा वाचविण्यासाठी प्रामुख्याने आच्छादनाचा वापर करावा. यासाठी उसाचे पाचट, गव्हाचा भुसा, लाकडी भुसा, गिरीपुष्पाची पाने, शेतातील टाकाऊ धस्कटे आणि काळी पॉलिथिन यांचा उपलब्धतेनुसार वापर करता येईल. ३० मायक्रॉनच्या पॉलिथिनने मल्चिंग केल्यास त्याचा पिकाला चांगला फायदा होतो. ठिबक सिंचन, रिकाम्या सलाईन बॉटल, मटका किंवा घडा पद्धतीने कमी पाण्यात फळबागांचे सिंचन करता येईल. याप्रसंगी कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषीरत्न विजयअण्णा बोराडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची उपस्थिती होती.
बाष्पीभवन थांबवा
शेततळ्यातील उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. या पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी प्रतिरोध झाडे, थर्माकोल, शेडनेट किंवा खराब तेलाचा वापर करता येईल. त्यासोबतच प्रति वर्ग मीटर २० मिली सिटाईल अल्कोहोलचा वापर करून सुद्धा बाष्पीभवन कमी करता येईल. असे सांगितले.