वाळू चोरी प्रकरण, महसूल विभाग आक्रमक pudhari photo
जालना

Illegal sand mining : वाळू चोरी प्रकरण, महसूल विभाग आक्रमक

अंबड तहसीलदारांचा वाळूमाफियांना अंतिम इशारा

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री : अंबड तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज चोरी करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाने अत्यंत कठोर आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी व्यापक कायदेशीर मोहीम राबवली जात असून, सराईत गुन्हेगारांना आता थेट कारागृहाची हवा खावी लागणार आहे.

आपेगाव-साष्टपिंपळगाव शिवारात 16 व 17 फेब्रुवारीच्या गोदावरी नदीपात्रात वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवा (क्र. -21-5939) चा मालक सचिन अशोकराव देशमुख (रा. रवना) आणि लोडर धारक मंगेश माऊली चौधरी (रा. आपेगाव) यांच्यासह इतर 10 ते 12 अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

लोडर धारकांना बोलावून वाळू अवैध उत्खनन करून भरून दिल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणी एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.गोंदी येथील हायवा व मिनी हायवा तसेच गावातील व परिसरातील ट्रॅक्टर बोलावून भरून देण्याचे काम केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली महसुलच्या पथकास मिळाली आहे. अंदाजे 30 ते 40 ब्रास वाळूची विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरटी विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी मालमत्तेवर बोजा असतानाही पुन्हा गुन्हा केला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. आरोपींच्या मालमत्तेवर दंडापोटी बोजा आहे, त्यांनी तत्काळ पैसे न भरल्यास त्यांच्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाचे नाव लावून त्या जमिनींचा जाहीर लिलाव केला जाणार आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार, थकबाकी न भरणाऱ्यांना दिवाळखोर घोषित करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि यंत्रसामग्री जप्त करून ती शासनाधीन केली जाणार आहेत.

अवैध वाळू केंद्र रडारवर

आपेगावच नव्हे, तर तालुक्यातील 25 पेक्षा जास्त गावांमध्ये जिथे अवैध उत्खनन सुरू आहे, त्यांचे सर्वेक्षण महसूल पथकांकडून सुरू आहे. शहागड आणि विहामांडवा मार्गे होणाऱ्या चोरट्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष गोपनीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

तालुक्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ज्यांच्या मालमत्तेवर बोजा आहे त्यांनी तत्काळ दंड भरावा. अन्यथा अटकेची कारवाई आणि मालमत्तेचा लिलाव अटळ आहे. हा केवळ इशारा नसून, आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली आहे.
विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT