Rare 'Samudra Manthan' Sculpture at the Ancient Shri Ram Temple in Bachegaon
अविनाश घोगरे
घनसावंगी : तालुक्यातील बाचेगाव येथील प्राचीन श्रीराम मंदिर हे सुमारे ८०० वर्ष पुरातन असून धार्मिक व ऐतिहासिक वारसा जपणारे महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. प्राचीन वास्तुकलेचा ठसा उमटवणारे हे मंदिर आजही आपल्या भव्यतेने आणि आध्यात्मिकतेने भाविकांना आकर्षित करत आहे.
मंदिरासमोर असलेली प्राचीन बारव ही हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील एक उत्कृष्ट नमुना असून, तिच्या दगडी बांधकामातून तत्कालीन स्थापत्यकलेची झलक पाहायला मिळते. या बारवेमुळे मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वात आणखी भर पडली असून, अभ्यासक आणि पर्यटकांसाठीही हे ठिकाण विशेष आकर्षण ठरत आहे.
या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले भगवान विष्ण-शी संबंधित दुर्मिळ 'समुद्रमंथन' शिल्प. अत्यंत सूक्ष्म कोरीवकामातून साकारलेले हे शिल्प पुराणकालीन समुद्रमंथन प्रसंग जिवंतपणे उभा करते. अशा प्रकारचे शिल्प दुर्मिळ असल्यामुळे भाविकांसह इतिहास व कला अभ्यासकांनाही ते पाहण्याची उत्सुकता असते. या शिल्पामुळे बाचेगावचे हे मंदिर परिसरातील एक वेगळे आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
मंदिरात श्रीराम, लक्ष्मण तसेच शेषनाग यांच्या आकर्षक व भावपूर्ण मूर्ती स्थापित असून, भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतात. मंदिर परिसरात नेहमीच शांत, पवित्र आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते.
या धार्मिक सोहळ्यात सर्व जाती-धर्मातील नागरिक एकत्र येऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत आहेत. विशेषतः तरुणपिढीचा वाढता सहभाग हा या उत्सवाचा सकारात्मक पैलू ठरत आहे.