शहागड : शहागड येथील बाजारात रमजानच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची फळे बाजारात विक्रीसाठी आल्याचे दिसून येत आहे.
रमजान महिन्यात विविध ठिकाणच्या मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. अनेक जण घरी रोजा इफ्तार करतात. विशेष म्हणजे घरीच रोजा इफ्तार करणारे एकमेकांच्या घरी इफ्तारासाठी लागणाऱ्या अन्न पदार्थासह फळांचे एकमेकांना वाटप करतात. त्यामुळे याकाळात सर्वच फळांना मागणी जास्त असते.
यंदा रमजान फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये आल्याने उन्हाचा तडाखा कायम असल्याने संध्याकाळी इफ्तारानंतर लिंबू सरबत, रसवंतीगृहे, ज्युस सेंटर आदी ठिकाणी शितपेयासाठी गर्दी होत आहे.
येथील फळ बाजारात मोसंबी, डाळिंब, अननस, पपई, सफरचंद, खजूर, कलिंगड, खरबूज, काकडी, खिरे, केळी, संत्रा, पेरू, द्राक्ष, चिकू, सीताफळ, बोरं, नारळ, आंब्यासह अनेक फळे विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. रमजानमुळे फळांची आवक व मागणी वाढली आहे.
फळांचे दर
अननस 60 ते 80 रुपये नग, मोसंबी 40 रुपये किलो, संत्रा-60 ते 80 रुपये किलो, आंबा लालबाग 180 ते 200 रुपये किलो, सफरचंद 220 रुपये किलो, नारळ 70 रुपये नग, डाळिंब-80 ते 100 रुपये किलो, कलिंगड 30 ते 100 रुपये नग, खरबूज 40 ते 50 रुपये किलो, पपई 60 ते 80 रुपये किलो, चिकू 30 ते 40 रुपये किलो, केळी 40 ते 50 रुपये डझन.
टरबुजाच्या रसात फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पोट साफ राहण्यासाठी ते फायदेशीर ठरते. टरबुजाचा रस नियमित घेतल्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढते. टरबूजाच्या रसात अमीनो ॲसिड्स आणि लाइकोपिन सारखे हृदयाला निरोगी ठेवणारे तत्त्व आढळतात. यामध्ये व्हिटॅमीन ए आढळते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.डॉ. वैष्णवी नरोडे, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र शहागड
पैठण भागातील टरबुजाला व्यापाऱ्यांची पहिली पसंती आहे. सध्या 20 ते 25 रुपये किलो ठोक टरबूज खरेदीचा भाव असून, वाहतूक खर्च लावत 30 ते 35 रुपये किलो किरकोळ दराने टरबुजाची विक्री करीत आहोत.इर्शाद बागवान, फळाचे व्यापारी शहागड