Rain brings life to crops in Anwa
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात गेल्या पंधरवड्यापासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने दोन दिवसांपासून रिमझिम स्वरुपात हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे नद्या-नाले अद्याप कोरडे असून विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.
वेळीच पाऊस आला नाही तर भीषण परिस्थिती उद्भ-वणार आहे. जून महिन्यात अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाची पिके करपू लागली असतानाच रिमझिम पाऊस आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
अशातच अचानक वातावरणात बदल होऊन सलग दोन-तीन दिवस रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे दमदार पाऊस सुरू होईल अशी बळीराजाची अपेक्षा आहे. खरिपाला जीवदान मिळाले असेल तरीसुद्धा बळीराजाची चिंता कायम आहे. निम्मा पावसाळा संपत आला असताना अजून जोरदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे विहीर, नाले कोरडे आहेत. पावसाळ्याच्या उरलेल्या दिवसात पाऊस झाला नाही तर परिस्थिती बिकट होणार आहे.
श्रावण महिना सुरू असतानाच पावसाचे आगमन झाले आहे. पूर्वी श्रावण महिन्यात संततधार पावसाने नागरिक त्रस्त होत असे. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीची कोळपणी, निंदणीची कामे उरकली असून शेतकऱ्यांनी पिकांना रासायनिक खते टाकण्याची तयारी सुरू केली आहे. रिमझिमऐवजी आता शेतकरी जोरदार पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.