Protest against idol theft in Kunthalgiri
जालना, पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या विद्यार्थी वसतिगृह, १००८ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराची जागा विक्री व्यवहार रद्द करावा, जैनांची काशी समजल्या जाणाऱ्या कुंथलगिरी येथील मूर्ती चोरी विरोधात जालना शहरात सोमवार (दि.२७) रोजी सकल जैन समाजाच्या वतीने दुचाकी मोर्चा काढण्यात आला.
समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करून वसतिगृह विक्री व्यवहार तात्काळ न थांबविल्यास सर्व विश्वस्त आणि विकासकाच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वसतिगृह विक्री व्यवहारा विरूद्ध संपूर्ण देशभरात जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून सकाळी सदर बाजार परिसरातील श्रेयांसनाथ दिगंबर जैन मंदिर येथे सकल जैन समाज बांधव व महिलांनी एकत्रितपणे येऊन दुचाकी वर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
मोर्चात सहभागी समाजबांधवांनी "बोर्डिंग आमच्या हक्काचं.., नाही कुणाच्या बापाचं..., रद्द करा,, रद्द करा,,, विक्री व्यवहार रद्द करा ..... कुंथलगिरी मूर्ती चोरीचा तपास लागलाच पाहिजे...! भगवान महावीर की जय,,, अहिंसा परमो धर्म की जय...!" अशा घोषणा देत शहर दणाणून सोडले.
आचार्य श्री करणार उपोषण...!
वसतिगृह, मंदिर विक्री व्यवहार रद्द करावा नसता ०१ नोव्हेंबरपासून दिगंबर जैन समाजाचे आचार्य श्री १०८ गुप्तीनंदी महाराज पुण्यात आमरण उपोषण करणार आहेत. ही जैन समाजासाठी अत्यंत क्लेशदायक बाब असल्याची भावना समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली.