Potholes on the Anwa-Bhokardan road
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वा ते भोकरदन या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे लक्षच नसल्याचे येथील नागरिकांचे आरोप होत आहे.
या खड्ड्यामुळे वाहनधारकांना, पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी भरत असल्याने खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे वाहन गेल्यास रस्त्यावरून ये-जा करणारे पादचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या अंगावर पाणी उडत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शाळेत ये-जा करणाऱ्या मुला-मुलींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने वेळीच या खड्ड्यांकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी आणि रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
आन्वा ते भोकरदन हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात छोटी-मोठी वाहने ये जा करत असतात. शालेय विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या रस्त्यावरून सातत्याने वाहनांची वर्दळ असते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे या डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांमध्ये वाहने जोरदार आदळत असल्याने वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले आहेत. खड्ड्यामुळे वाहनचालकांना मणक्याचे आजार होत आहे.
पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, सता चिखलमय झाला आहे. तरी लवकरात लवकर या डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.बबलू पठाण, वाहनचालक वाकडी
गेल्या काही महिन्यांपासून आन्वा गावातील तसेच भोकरदन - आन्वा मुख्य रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र व निवेदन देऊन देखील याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत. येत्या दोन दिवसांत या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करणार.दीपक सोनवणे, काँग्रेस युवा कार्यकर्ते