जालना : देशभरात सुरू झालेल्या जनगणना 2027 मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात जालना महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. शहरातील जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या गणकांना आवश्यक साहित्य, ओळखपत्रे आणि पूर्ण पत्रके न मिळाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गणकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जालना शहर परिसरातील 476 गणक व 76 पर्यवेक्षकांना शनिवारी सकाळी मास्टर फुलंब्री थिएटर येथे जनगणना साहित्य वाटपासाठी बोलावण्यात आले होते. मात्र वेळेबाबतच गोंधळ निर्माण झाला. काहींना सकाळी 8 तर काहींना 11 वाजताची सूचना देण्यात आल्याने गणकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
प्रत्यक्षात साहित्य वाटपावेळी गणकांना केवळ प्रशिक्षणासाठीचे पुस्तक, नकाशासाठी दोन कागद व एक मार्कर पेन देण्यात आले. आवश्यक पत्रके व ओळखपत्रे उपलब्ध नसल्याने गणकांनी नाराजी व्यक्त केली. ‘आम्हाला जे दिले, तेच आम्ही देत आहोत,’ असे उत्तर संबंधित कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्याचे गणकांनी सांगितले.
दरम्यान, ओळखपत्रांशिवाय क्षेत्रात गेलेल्या गणकांना अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी ओळखपत्रांशिवाय फिरू नका, असा सल्लाही नागरिकांनी दिला, असल्याचे प्रगणकांनी सांगितले.