Ponds formed in front of the Municipal Corporation office; citizens face inconvenience
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जालना महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचून परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिकेच्या दारातच पाणी साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. वाहनांच्या ये-जा दरम्यान चिखलयुक्त पाणी अंगावर उडत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात शहरातील समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. आयुक्त आणि जिल्हाधिकारी काम करण्याचा प्रयत्न करीत असले तरी काही अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे व हलगर्जीपणामुळे अशा समस्या निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.