अंबड : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट प्रकरणातील तिसरा आरोपी कांचन साळवे याला पोलिसांनी बीड येथून जेरबंद केले असून, त्याच्यासह यापूर्वी पकडण्यात आलेल्या अमोल खुणे व दादा गरुड यांना बुधवारी (दि.12) अंबड येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी अमोल खुणे व दादा गरुड यांची पोलिस कोठडी संपल्याने त्या दोघांना दोन दिवसांची वाढीव, तर संशयित आरोपी कांचन साळवीला 14 नोव्हेंबरपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायाधीशांनी सुनावली.
जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणार्य़ा अमोल खुणे व दादा गरुड या दोन संशित आरोपींना जालना गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील गेवराई येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, जालना गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत कांचन साळवी याचे नाव पुढे आल्याने जालना पोलिसांनी कांचन साळवीला मंगळवारी (दि.11) उशिरा ताब्यात घेतले होते.