PM SVANidhi Scheme pudhari photo
जालना

PM SVANidhi Scheme : पथविक्रेत्यांना 21.56 कोटींचे कर्ज वाटप !

पीएम स्वनिधी ः सहा वर्षांत हजारो लघु व्यावसायिकांना आर्थिक बळ; छोट्या व्यावसायिकांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू

पुढारी वृत्तसेवा

जालना : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‌‘पीएम स्वनिधी‌’ योजनेच्या सहा वर्षांच्या प्रवासात जालना शहरातील पथविक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जालना शहर महानगरपालिका आणि विविध बँकांच्या समन्वयातून हजारो लाभार्थ्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेमुळे लहान व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे.

जालना शहर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, योजनेच्या पहिल्या टप्प्यात 10 हजार 472 लाभार्थ्यांना सुमारे 11 कोटी 2 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 3 हजार 286 लाभार्थ्यांना 7 कोटी 4 लाख रुपयांचे कर्ज मिळाले. तर तिसऱ्या टप्प्यात 703 लाभार्थ्यांना सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

एकूण 14 हजार 461 लाभार्थ्यांना 21 कोटी 56 लाख रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य मिळाल्याने शहरातील पथविक्रेते, फेरीवाले आणि लघुव्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यास मोठी मदत झाली आहे. विशेषतः कोरोनानंतरच्या काळात या योजनेने अनेक कुटुंबांना नवसंजीवनी दिली असून रोजगार टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या योजनेंतर्गत वेळेवर कर्जफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज सवलीचाही लाभ मिळत आहे. त्यामुळे अनेक पथविक्रेते बँकिंग व्यवस्थेशी लिंक झाल्यामुळे त्यांचा आर्थिक व्यवहार अधिक सक्षम होत आहे.

जालना महानगरपालिकेच्या पुढाकारामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ प्रभावीपणे पोहोचत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पथविक्रेते अद्यापि हक्काच्या जागेविना

शहरातील विविध भागांमध्ये जवळपास 4 ते 5 हजार पथविक्रेते आहे. त्यांना कायमस्वरूपी जागा देण्यासाठी सर्व्हे करण्यात आला. परंतु, अजूनही त्यांना हक्काची जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांना जागा मिळवून देण्यासाठी मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शहरातील मुख्य बाजार, मामा चौक, गांधी चमन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, कन्हैया नगर, सदर बाजार रोड, जुना जालना, नूतन वसाहत आदींसह इतर भागात पथविक्रेते मोठ्या प्रमाणात आहे.

लाभार्थीनिहाय वाटप करण्यात आलेले कर्ज

प्रथम कर्ज : 10,472 लाभार्थी -11.02 कोटी

द्वितीय कर्ज : 3,286 लाभार्थी - 7.04 कोटी

तृतीय कर्ज : 703 लाभार्थी - 3.50 कोटी

एकूण लाभार्थी : 14,461 - 21.56 कोटी

या योजनेमुळे हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना मदत मिळाली आहे. या कर्ज सुलभीकरणात आता वाढ होणार आहे. गरजू किरकोळ व्यावसायिकांना व्यवसाय वाढीसाठी चांगली मदत झाली आहे. या मदतीतून अनेकांनी आपला व्यवसाय वाढवला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना व्याज माफीचा देखील लाभ मिळत आहे.
मंगेश केदार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT