पिंपळगाव रेणुकाई ः खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्रसिद्ध मंगळवारी भरणाऱ्या बैल बाजारात शेतकऱ्यांची बैल खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शेतीच्या कामासाठी मजबूत आणि सक्षम बैलजोडी खरेदी करण्यासाठी परिसरासह दूरवरच्या भागांतून शेतकरी मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. खरीप हंगामाच्या तोंडावर बैलजोडीच्या किंमतीत मोठी वाढ झाली असुन बैल जोडीचे दर लाखावर पोहचल्यामुळे शेतकऱ्यांना बैलजोडी विकत घेणे अवघड बनले आहे.
सध्या शेतीमशागतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला असला, तरी ग्रामीण भागात अनेक शेतकरी आजही बैलांच्या सहाय्याने शेतीची कामे करण्यावर भर देताना दिसतात. जनावरांचे संगोपन हे केवळ आर्थिक साधन नसून कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. त्यामुळेच बाजारात चांगल्या बैलजोडीला मोठी मागणी निर्माण झाली असून दरही लक्षणीयरीत्या वाढले आहेत.
बाजारात सध्या साधारण बैलजोडीची किंमत 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत पोहोचली असतांनाच मजबूत, सुदृढ आणि शेतीसाठी उपयुक्त बैलजोडीला एक लाख रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी उत्कृष्ट बैलजोडी खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने बैलजोडचे दर आणखी वाढत असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली.
पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजार हा जिल्ह्यातील महत्त्वाचा जनावरांचा बाजार म्हणून ओळखला जातो. या बाजारात खान्देश, विदर्भ व मराठवाडा या भागांमधून मोठ्या प्रमाणात पशुधन विक्रीसाठी आणले जाते. विशेष म्हणजे परराज्यातील व्यापारी देखील मोठ्या प्रमाणावर येथे दाखल होऊन जनावरांची खरेदी करतात. त्यामुळे या बाजाराला प्रादेशिकच नव्हे तर राज्यस्तरावरही वेगळी ओळख मिळाली आहे.
विशेषतः बैलजोडीच्या खरेदी-विक्रीला या बाजारात मोठे महत्त्व आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या कामांमध्ये बैलांचे योगदान अजूनही अनेक शेतकऱ्यांसाठी अनमोल आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर योग्य आणि मजबूत बैलजोडी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
खरीप पेरणीचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतशी बाजारातील हालचाल आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही आठवड्यांत बैलजोडीची मागणी अधिक वाढेल आणि बाजारातील उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे.
विक्री करताना काहूर
शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे संभाळ करतात.मात्र काही वेळा पैशाची गरज असल्याने शेतकऱ्यांसमोर बैलजोडी विकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहत नसल्याने त्यांना नाईलाजाने लाडक्या बैलजोडीची विक्री करावी लागते. जिवापाड जपलेले बैल लोकांच्या हातात देताना शेतकऱ्यांच्या मनात मोठे काहुर उठत असल्याचे चित्र बाजारात पहावयास मिळत आहे.