पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मिरचीचे आगार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजारात सध्या हिरव्या मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू आहे.
सुरुवातीला चारशे टनाची आवक असणाऱ्या मिरची बाजारात सध्या मागील दोन आठवड्यांपासून एक हजार टन मिरची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती येथील व्यापाऱ्याने दिली आहे.
सध्या मिरचीला बाजारात जवळजवळ सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खेळू लागला आहे. हिरव्या मिरचीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी पारंपरिक पिकातून अपेक्षित उत्पादन हाती लागत नसल्याने मागील गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पिकांना फाटा देत मिरची पिकाकडे वळला आहे. तसेच मिरचीतून दरवर्षी चांगले उत्पन्न हाती लागत असल्याने या भागातील मिरची उत्पादक शेतकरी देखील वाढले असून दिवसेंदिवस मिरची लागवडीत वाढ होत आहे. यंदा देखील परिसरातील शेतकऱ्यांनी जवळजवळ अडीच हजार हेक्टरवर मिरची पिकाची लागवड केली.
पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी अशा प्रकारे मिरची तोड करुन ठेवत आहेत. येथील मिरची बाजार येथील बाजार समितीत भरतो. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाजार समितीकडे महसूल गोळा देखील होत आहे. शेतकरी व व्यापारी यांना बाजार समितीकडून सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांची गैरसोय, फसवणूक होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात लागवड केलेली मिरची बाजारात विक्रीसाठी येऊ लागली आहे. हिरव्या मिरचीला सध्या जवळजवळ बाजारात साडे सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागला आहे.
पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारपेठेत इतर राज्यातील व्यापारी खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहे यामुळे व्यापाऱ्यांच्या गाड्या व शेतकऱ्यांच्या बैलगाडी, टेम्पो ट्रॅक्टर, रिक्षा जास्त येत असल्याने वाहतूक कोंडी होते. पारध पोलिसांच्या वतीने बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून काळजी घेण्यात येते. या ठिकाणी एका पोलिस कर्मचारी यांची ड्युटी लावण्यात आली असल्याने वाहन चालकांना शिस्त लागली.संतोष माने, सहायक पोलीस निरीक्षक, पारध
पिंपळगाव रेणुकाई येथील हिरवी मिरची सध्या मुंबई, वाशी, पुणे, सुरत, नागपूर, दिल्ली, दुबई, बांगलादेश, हैदराबाद, लखनौ, पंजाब, छत्तीसगढ, अजमगढ, बनारस, भंडारा, जबलपूर, शिवनी, जोधपूर, फैजाबाद, खलीलाबाद आदी ठिकाणी विक्रीसाठी जात आहे.