पिंपळगाव रेणुकाई : येथील शेतकरी बद्री देशमुख यांनी माळ रानावर फुलविली वालाची शेती.  (छाया : संदीप देशमुख)
जालना

Jalna Agriculture: दहा गुंठ्यांत वाल फुलाचे एक लाखाचे उत्पन्न

शेतकरी बद्री देशमुख यांनी माळरानावर फुलविली वालाची शेती

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव रेणुकाई: भोकरदन तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, बोअरवेल कोरड्याठाक पडल्या असताना अनेक शेतकऱ्यांनी शेती पडीक ठेवली. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही पिंपळगाव रेणुकाई येथील प्रयोगशील शेतकरी बद्री देशमुख यांनी जिद्द, मेहनत आणि नियोजनाच्या जोरावर दहा गुंठ्यामध्ये वाल फुलाची शेती करून एक लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. त्यांची ही यशोगाथा तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

देशमुख यांच्याकडे अत्यंत कमी क्षेत्र आहे. यंदा पाण्याची भीषण टंचाई असल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा त्यांनी रब्बी हंगामात काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दहा गुंठे क्षेत्रात वाल फुलाची लागवड केली. पिकाला पाणी देण्यासाठी त्यांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागले.

पाण्याचा प्रत्येक थेंब वाया जाऊ नये म्हणून त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आणि बांबूच्या सहाय्याने मांडव पद्धतीचा अवलंब केला.साधारण अडीच ते तीन महिन्यांत वाल फुलाचे पीक बहरले. बाजारात वालाच्या शेंगांना चांगली मागणी असल्याने त्यांना प्रति किलो २५ ते ३० रुपये भाव मिळाला.

आतापर्यंत त्यांनी टप्प्या-टप्प्याने सुमारे १५ क्विंटल पेक्षा जास्त माल बाजारात विकला आहे. टँकर आणि मजुरीचा खर्च वजा जाता त्यांना एक लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा झाला आहे.

भाव मिळाल्याने नफा- सुरुवातीला विहिरीत पाणी असल्यामुळे दहा गुंठे वालाची लागवड केली. यानंतर पाऊस न आल्याने विहिरीत पाण्याने तळ गाठला. यामुळे टँकर विकत घेऊन वाल जगविले. बाजारात चांगला भाव भेटल्याने नफा जास्त झाला आहे.
बद्री देशमुख, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT