Pimpalgaon Renukai: Crops on hundreds of hectares damaged due to lack of rain
पिंपळगाव रेणुकाईत, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडो हेक्टरवरील मका पिकाचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असतानाही एप्रिल-मे महिन्यासारखा कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरात मका आणि सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके जोमात आली होती. मक्याला कणसे लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने खंड दिला सततच्या कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या असून पिके माना टाकू लागल्या आहेत.
कणसे पोसली जात नसल्याने दाणे भरण्याऐवजी कणसे वाळून जात आहेत. विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठल्याने पिकांना पाणी देण्याचीही सोय राहिली नाही. शेतकऱ्यांनी एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च करून मक्याची पेरणी केली होती. मात्र आता पीक हातचे जाण्याची भीती असल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे. सोयाबीनचेही अशीच परिस्थिती असून शेंगा भरण्याऐवजी झाडे करपू लागली आहेत. सततच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला.
तातडीने मदत द्या
शासनाने तात्काळ या भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना हेक्टरी ७० ते ८० हजार रुपयांची मदत, पीकविमा व कर्जमाफी द्यावी, अशी मागणी पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.