Persons with disabilities will receive assistance through the center
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन आणि पुनर्वसनासाठीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी याकरिता दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्राद्वारे जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी केले.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, दिव्यांग पुनर्वसन केंद्रांमुळे दिव्यांग व्यक्तींना अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळण्यास मोठी मदत होणर आहे. अशा केंद्रांचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांगांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना मोठा आधार मिळणार आहे. या कार्यक्रमास नागरिक, दिव्यांग बांधव, संघटनेचे पदाधिकारी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
सहकार्य करू
या केंद्राच्या माध्यमातून त्यांना योग्य मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता, वैद्यकीय मदत आणि पुनर्वसनाच्या सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. जालना येथील हे केंद्र महाराष्ट्रात अग्रस्थानी पोहोचावे यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले