परतुर ः किरकोळ घरगुती वादातून जन्मदात्या मुलाने सोळा वर्षीय मुलीच्या चिथावणीवरून पोटच्या आईचा छातीत चाकू खुपसून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना परतूर तालुक्यातील सालगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वसंताबाई मुंजा ठोके (वय 55) असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा अंशीराम ठोके याला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन नातीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
परतूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत सालगाव येथील मुंजा तुळजीराम ठोके यांनी म्हंटले आहे की, ते मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा अंशीराम हा पत्नी मुलांसह मुंजा ठोके यांच्या घराच्या पाठीमागील घरात स्वतंत्र राहत होता.
25 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अंशीराम आणि त्याची पत्नी कविता यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू होते. यावेळी आरडाओरडा ऐकून मुंजा ठोके यांच्या पत्नी वसंताबाई या मध्यस्थी करण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी मुलाच्या घरी धावून गेल्या.
भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच, नात रागात वडील अंशीराम यांना म्हणाली की, या म्हातारीचा आपल्याला नेहमीचाच त्रास आहे, तुम्ही आज यांचा विषयच संपवून टाका.मुलीच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे अंशीराम याने रागाच्या भरात स्वतःच्या हातातील धारदार चाकूने आई वसंताबाई यांच्या डाव्या छातीवर जोरदार वार केला.
हा वार इतका भीषण होता की, वसंताबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. रक्ताने माखलेला चाकू तिथेच टाकून आरोपी बाप-लेक पसार झाले.रक्तबंबाळ अवस्थेत वसंताबाई यांना सेलू येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले.
आरोपीस कोठडी
आरोपी अंशीराम ठोके याला 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती, तर बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड हे करत आहेत.