परतूर शहरात महावितरणचा दणका; 10 जणांविरुद्ध गुन्हा pudhari photo
जालना

Electricity theft case : परतूर शहरात महावितरणचा दणका; 10 जणांविरुद्ध गुन्हा

कारवाईत सुमारे 1 लाख 16 हजार 450 रुपयांची वीज चोरी उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

परतूर ः शहर आणि परिसरात महावितरणने वीज चोरांविरुद्ध कडक मोहीम उघडली असून, अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या 10 जणांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात 27 एप्रिल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे 1 लाख 16 हजार 450 रुपयांची वीज चोरी उघडकीस आली असून महावितरणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेली अधिक माहिती अशी की, महावितरणचे सहायक अभियंता राधेश्याम कुमावत आणि त्यांच्या पथकाने परतूर शहर आणि मसला परिसरात वीज जोडणीची तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान, अनेक ग्राहकांनी महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर थेट आकडा टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून अनधिकृतपणे वीज वापरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या कारवाईत एकूण 6,629 युनिट्सची वीज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी किसन शिंदे, बाळासाहेब पिंपळे, ज्ञानेश्वर काळे, वैभव ब्राह्मणे, लक्ष्मण गुंजमुर्ती, बाबु कुरेशी, जहुर कुरेशी, लुकमान कुरेशी, गुलाब सरडे आणि रशीद नानु कुरेशी (सर्व रा. परतूर व मसला) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या सर्वांनी मिळून घरगुती वापरासाठी बेकायदेशीररीत्या विजेचा वापर केला.

सहायक अभियंता राधेश्याम कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांनी भारतीय विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 आणि 138 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वीज चोरी करणाऱ्यांनी दंडासह थकबाकी न भरल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT