Pankaja Munde Pudhari
जालना

Antarwali Sarati: पंकजा मुंडे घेणार अंतरवाली सराटी गाव दत्तक

Jalna Drought News: दुष्काळ निवारणासाठी प्रभावी नियोजन करा : मुंडे

पुढारी वृत्तसेवा

Antarwali Sarati Pankaja Munde News

जालना : जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पीक पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज दिले. गांव दत्तक अभियानांतर्गत सर्वांगीण विकासासाठी अंतरवाली सराटी हे गाव दत्तक घेत असल्याचे सांगून पुढील महिन्यात आपण या गावास भेट देणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

पालकमंत्री पंकजाताई मुंडे या शुक्रवारी जालना दौऱ्यावर आल्या होत्या, यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जि प चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील ९५४ गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती असून, या गावातील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत. पीकविमा प्रक्रियेतही पारदर्शकता व अचूकता राखण्याच्या सूचना देत, शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्तीत-जास्त लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावा. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर जीपीएसने नियंत्रण ठेवा.

जलस्रोतांचे पुनर्भरण करा तसेच नदी-नाल्यांचे खोलीकरण करा अशा सुचनाही त्यांनी केल्या. पाणी वापरात दहा टक्के कपातीच्या आदेशांची अंमलबजावणी करावी व बांधकामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर टाळावा, असेही निर्देश त्यांनी दिले. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा साक्षरता अभियान राबवून मुरघास, हायड्रोपोनिक्स व अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण द्यावे यासह इतर सुचना त्यांनी केल्या.

सर्वांगीण विकासासाठी अंतरवाली सराटी गाव दत्तक

‘गाव दत्तक अभियान’ अंतर्गत दुष्काळग्रस्त गावांना मदत देण्याच्या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. या अंतर्गत सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आपण अंतरवाली सराटी गाव दत्तक घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहितेनंतर याठिकाणी आपण भेट देणार असल्याचे त्या म्हणाल्या. दुष्काळग्रस्तांना मदत करताना सीएसआर च्या बरोबरीने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान देखील पुढे राहील असे त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT