No compensation was received despite taking out crop insurance.
आन्वा, पुढारी वृत्तसेवा यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली असून शेतकऱ्यांनी खरीप पिक संरक्षणासाठी विमा काढला होता, परंतू या योजनेत भरपाईसाठी केवळ पीक कापणी प्रयोग हाच एकमेव निकष ठेवल्यामुळे खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर व रोगराईमुळे मोठचा प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाचीही भरपाई मिळालेली नाही.
दरम्यान बोगस अर्ज, तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांपेक्षा पीकविमा कंपन्यांनाच अधिक फायदा होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांचा फक्त एक रुपयात सहभाग अशी पीकविमा योजना लागू केली. ही रद्द करून पुन्हा जुनीच योजना लागू केली. नुकसान भरपाईसाठी तालुका किंवा मंडळस्तरावर घेतले जाणारे पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आला आहे.
हवामान, प्रत्यक्ष नुकसान पंचनामे किंवा तक्रारीना दुय्यम स्थान आहे. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रत्यक्ष शेतात नुकसान स्पष्ट दिसत असतानाही पीक कापणी प्रयोगांचे निकाल सामान्य उत्पादन दाखवत असल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. परिणामी शंभर टक्के भरपाईचे शासनाचे आदेश कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.
जुन्या पीकविमा योजनेप्रमाणे हवामान निकष, प्रत्यक्ष नुकसान पंचनामे आणि तक्रार निवारण यंत्रणा लागू करण्याची मागणी सतत होत आहे. सध्याची योजना रद्द करून शेतकऱ्यांभिमुख योजना लागू करावी अशी जोरदार मागणी होत आहे. नव्या योजनेमध्ये स्थानिक आपत्तीचे ट्रिगर वळगण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे नव्या योजनेत केवळ पीक कापणी प्रयोग गृहित धरला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहेत.
नाराजी व्यक्त
नैसर्गिक आपत्ती कोसळली तरी भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष शासनाने ठेवला आहे. त्यामुळे पीक काढणीपूर्वी नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. परिणामी, पीक कापणी प्रयोगाच्या निकषाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.