जालना : देशातील विकासात मागे राहिलेल्या तालुका व ब्लॉक स्तरावरील भागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नीती आयोगाने आकांक्षित तालुका (ब्लॉक) कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा पुढचा टप्पा मानला जात असून, जिल्हा पातळीवर सुधारणा झाल्यानंतर आता थेट तालुका व ब्लॉक स्तरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि परतूर या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे या तालुक्यांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. सामाजिक, आर्थिक व मानवी विकास निर्देशांकांच्या आधारे तसेच आरोग्य, शिक्षण, पोषण, कृषी, रोजगार व पायाभूत सुविधांमध्ये मागे असलेल्या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. देशभरातील 500 हून अधिक तालुका व ब्लॉक या कार्यक्रमात सहभागी आहेत.
हा कार्यक्रम निकाल केंद्रित असल्याने तालुका स्तरावरील कामगिरी ठराविक निर्देशांक, डेटा व रँकिंग प्रणालीच्या आधारे मोजली जाते. तालुकानिहाय कृती आराखडे तयार करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. रिअल-टाईम डेटा डॅशबोर्डद्वारे प्रगतीवर लक्ष ठेवले जात असून, मासिक व त्रैमासिक रँकिंगद्वारे सर्वाधिक सुधारणा करणाऱ्या तालुक्यांना प्रोत्साहन दिले जाते.
महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी व दुष्काळग्रस्त भागांसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, आरोग्य व शिक्षण निर्देशांकात सुधारणा, कृषी उत्पन्न वाढ आणि प्रशासकीय कामकाजात गती असे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. बदनापूर व परतूर तालुके या कार्यक्रमातून अपेक्षित प्रगती साधतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
ही आहेत कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न क्षेत्र, पाणी व स्वच्छता तसेच पायाभूत सुविधा व रोजगार या प्रमुख क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. माता व बालमृत्यू दर कमी करणे, लसीकरण व पोषण सुधारणा, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शुद्ध पाणीपुरवठा आणि स्थानिक रोजगार निर्मिती ही या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
केंद्रीय पथकाने दिली होती भेट
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत परतूर तालुक्यात कोणत्या कामावर लक्ष देण्यात आले आहे. शिक्षण, पोषण, आरोग्य यासह पायाभूत सुविधा, शेती, पाणी आदी बाबींची पाहणी गत महिन्यात केंद्रीय पथकाने केली होती. या तालुक्यातील विकास कामांचा आढावा देखील घेण्यात आला होता.