Natural Farming: Adopting natural farming is the need of the hour – Shinde
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : शाश्वत उत्पन्नासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करणे काळाची गरज आहे, असे मत तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती साहेबराव कानडजे, गोविंदराव पंडित, मस्के साहेब, मुकेश भारद्वाज यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नैसर्गिक शेतीचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर्षी नावीन्यपूर्ण पीक म्हणून सफेद मुसळीची लागवड निवडक शेतकऱ्यांकडे प्रायोगिक स्वरूपात करण्यात आली असून या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. तसेच कापूस क्रांती योजनेंतर्गत उच्च घनतेची लागवड, आंतरपीक पद्धती आणि १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे आवाहनही केले.
अतिरेकामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. शासनाच्या नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत गो-रूप अमृतसारख्या जैविक तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यात येत असून त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.