'Mudra' is a celebration of ideas in the literary world of Jalna.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालन्यातील साहित्यविश्वाला नवी दिशा देणाऱ्या मुद्रा साहित्य सेवा संस्थेने २०२५ या सरत्या वर्षात विविधांगी साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवला. प्रस्थापित आणि नवोदित साहित्यिक यांची प्रभावी सांगड घालत संस्थेने वर्षभर काव्य, विचार आणि सांस्कृतिक जाणीवेचा उत्सव साजरा केला. त्यामुळे जालन्याच्या साहित्य वर्तुळात 'मुद्रा' हे नाव काव्यमय ओळखीचे प्रतीक बनले.
वर्षाची सुरुवात ३१ जानेवारी रोजी मुद्रा साहित्य सेवा संस्थेचे अध्यक्ष कवी कैलास भाले यांच्या मातोश्री वेणूताई विश्वनाथ भाले स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित स्मृती कविसंमेलनाने झाली. त्यानंतर 'स्व. समुद्राबाई काळे राज्यस्तरीय पुरस्कार' सोहळा पार पडला. छत्रपती संभाजीनगर येथील साहित्यिक कवी सुनील उबाळे यांना ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, जालना येथे 'संविधान' या विषयावर आयोजित काव्यसंमेलनाने सामाजिक जाणीव जागवली. संविधान मूल्यांवर आधारित अर्थगर्भ कवितांनी श्रोत्यांना विचारप्रवृत्त केले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अण्णा सावंत व ज्येष्ठ साहित्यिक राम गायकवाड यांची उपस्थिती होती.
'स्वातंत्र्य का छुपा बंदीवास' ही काव्य मैफिल विशेष गाजली, मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर विद्युतनगर येथे गझलकार सुनील लोनकर यांच्या निवासस्थानी पावसावर आधारित काव्य मैफिल रंगली. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नागसेन ग्रंथालयाच्या सहकार्याने आयोजित कवी संमेलनात सुप्रसिद्ध कवी जगतपुरिया यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
कवी गणेश खरात यांच्या 'माती म्हणे आभाळाला' या कविता संग्रहाचे प्रकाशन, कोजागिरी पौर्णिमेच्या काव्य मैफिली, नवोदित कवींना व्यासपीठ देणाऱ्या काव्य बैठका, त्रैभाषिक कविसंमेलन, 'किरुवा' कवी संमेलन आणि राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्या नाटकाच्या कलावंतांचा सत्कार अशा उपक्रमांमुळे २०२५ हे वर्ष जालन्याच्या साहित्यविश्वासाठी संस्मरणीय ठरले. मुद्रा साहित्य सेवा संस्थेचे कैलास भाले, मनीष पाटील, रमेश देहडकर, प्रा. पंढरीनाथ सारके, सुनील लोनकर, शिवाजी तेलंगे, सुधाकर वाहुळे यांच्या योगदानातून साहित्य रसिकांना वर्षभर वैचारिक आणि काव्यमय मेजवानी मिळाली.
राज्यस्तरीय गझल संमेलनाने रंगला काव्यसंवाद
नोव्हेंबर महिन्यात जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, अक्षर वैभव साहित्य परिषद व गझल मंथन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय गझल संमेलन पार पडले. राज्यातील नामवंत गझलकारांच्या सहभागाने 'काव्य संवाद' आणि 'हृदयाची पिंपळपाने' ही संगीतमय गझल मैफिल विशेष रंगतदार ठरली.