MLA Santosh Danve inspected the crop damage
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवाः जाफ्राबाद तालुक्यातील महसूल मंडळ शिवारात पावसाच्या दीर्घ खंडामुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी आमदार संतोष दानवे व कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगून प्रयत्न करण्याची मागणी केली.
खरीपातील हाता-तोंडाशी आलेले - सोयाबीन, कापूस व मका पिके पावसाअभावी डोळ्यांसमोर सुकत असल्याने बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आ. दानवे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी बोलतांना आ. दानवे म्हणाले की, संकटसमयी शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आमची प्राथमिकता आहे.. आपले सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाकडून सर्वतोपरी मदत व दिलासा मिळावा यासाठी शासन आणि प्रशासन पातळीवर व्यक्तिशः
सातत्याने पाठपुरावा करणार आहे. असे आश्वासन यावेळी संतोष दानवे यांनी दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, तहसीलदार मंगेश साबळे, माजी सभापती शालिकराम म्हस्के, संतोष पाटील लोखंडे, सरपंच गजानन लहाने, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.