MLA Arjun Khotkar's name removed from the bord
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील चंदनझिरा येथील पीआर कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावरून विद्यमान आमदारांचे नाव वगळल्याने शिवसैनिकांनी संतात व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा नामफलक उखडून फेकला आणि त्या फलकाला काळे फासले. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच भाजप आणि मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत श्रेय वादावरून कार्यकर्त्यांत जुंपली असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जालना शहर महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी धारकांना मालमत्ता पत्रक (पीआर कार्ड) देण्याच्या सर्व्हेचा शनिवार, दि. २५ रोजी सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. जल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, या उद्घाटन सोहळ्याच्या नामफलकावरून जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुनराव खोतकर यांचे नाव वगळल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा नामफलक उखडून टाकला आणि त्याला काळे फासून आपला निषेध व्यक्त केला.
जालना शहर महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टीधारकांना मालमत्ता पत्रक (पीआर कार्ड) देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्याचे उद्घाटन चंदनझिरा येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.
विद्यमान आमदाराचे नाव नसल्याने निषेध
नामफलकावर विद्यमान आमदारांचे नाव नसल्याने चंदनझिरा येथील शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी त्वरित हा नामफलक उखडून टाकला आणि त्यावर काळे फासले. यावेळी शिवसैनिक अंबादास चित्तेकर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.