जालना ः नशिबाचे चक्र आणि पोलिसांच्या जिद्दीचा अजब संगम जालना जिल्ह्यात पहायला मिळाला आहे. तब्बल 11 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा शोध लावण्यात जालना स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, आई-वडिलांची आपल्या काळजाच्या तुकड्याशी झालेली भेट पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
मूळचे पिंपळगाव कड (ता. जाफराबाद) येथील रहिवासी असलेले समाधान तेजराव कड हे 2015 मध्ये कुटुंबासह कामानिमित्त आशेगाव चौक (ता. गंगापूर) येथे गेले होते. 10 जानेवारी 2015 रोजी त्यांचा 15 वर्षीय मुलगा सोमीनाथ कड हा दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अचानक बेपत्ता झाला होता. पालकांनी सर्वत्र शोध घेतला, पोलिसांत तक्रारही केली; मात्र तब्बल 11 वर्ष उलटूनही सोमीनाथचा पत्ता लागला नव्हता.
पोल्ट्री फार्मवर लागला शोध
मिळालेल्या आधार कार्डच्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर सोमीनाथ हा नाशिक जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डी येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता, सोमीनाथ हा एका पोल्ट्री फार्मवर काम करताना मिळून आला.