Subsidy Scam : जालन्यातील २४ कोटींच्या अनुदान घोटाळ्याचा मास्टरमाइंड जेरबंद File Photo
जालना

Subsidy Scam : जालन्यातील २४ कोटींच्या अनुदान घोटाळ्याचा मास्टरमाइंड जेरबंद

घनसावंगीचा सहायक महसूल अधिकारी आशिष पैठणकरला अटक

पुढारी वृत्तसेवा

Mastermind of Rs 24 crore subsidy scam in Jalna arrested

जालना, पुढारी वृत्तसेवा :

जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या अनुदानात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. घनसावंगी तहसील कार्यालयातील तत्कालीन सहायक महसूल अधिकारी आशिष प्रमोदकुमार पैठणकर याला जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तो गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. या कारवाईमुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या ३२ वर पोहोचली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत जाहीर केली होती. मात्र, अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून खऱ्या लाभार्थ्यांऐवजी बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत घुसडली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार, २४० गावांमध्ये तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा शासकीय अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी आशिष पैठणकर फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असताना तो सतत आपले मोबाईल क्रमांक आणि राहण्याची ठिकाणे बदलत होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो विविध धार्मिक स्थळांवर वास्तव्य करत असल्याची माहिती तपासात समोर आली होती. अखेर, तो जालन्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.

गावोगावी एजंटचे जाळे

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, पैठणकरने अनुदानाची रक्कम लाटण्यासाठी गावोगावी खासगी एजंट नेमले होते. या एजंटमार्फत बोगस नावे गोळा करून ती शासकीय यादीत अपलोड केली जात होती. या रॅकेटमधील आणखी काही नावे पोलिस चौकशीत उघड होण्याची शक्यता आहे.

३५ पैकी ३२ आरोपी गजाआड

या महाघोटाळ्यात एकूण ३५ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३२ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुख्य सूत्रधारच गजाआड झाल्याने आता उर्वरित ३ फरार आरोपींचे धाबे दणाणले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT