Married Woman Harassed for Dowry; Beaten Up on Suspicion of Character
जालना, पुढारी वृत्तसेवा लग्नानंतर काही महिने चांगले वागवून नंतर चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये, नाहीतर तुला पाहून घेईल, अशी धमकी देत विवाहितेला घराबाहेर हाकलून देण्यात आले. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ज्योती संतोष पगारे (२३, रा. नळणी बु. ता. भोकरदन, ह.मु. माळशेंद्रा, जि. जालना) यांचे लग्न ४ जून २०१५ रोजी संतोष प्रकाश पगारे यांच्याशी झाले होते. त्यांना १० वर्षांचा मुलगा आणि ६ वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर सुरुवातीचे चार महिने ज्योती यांना सासरी चांगली वागणूक मिळाली, मात्र त्यानंतर त्यांच्या छळाला सुरुवात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पती संतोष हा ज्योती यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना वारंवार शिवीगाळ करत असे. सासरच्या इतर मंडळींनी पतीचे कान भरले. यावरून पतीने ज्योती यांना सतत मारहाण केली आणि माहेरून ५० हजार रुपये घेऊन येण्याची मागणी केली.
हा जाच असह्य झाल्याने ज्योती यांनी आपल्या आई-वडिलांना ही माहिती दिली. माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सासरच्यांनी त्यांनाही शिवीगाळ केली. 'आम्हाला तुमची मुलगी नांदवायची नाही,' असे ठणकावून सांगत ज्योती यांना घराबाहेर हाकलून दिले. अखेर १९ मार्च २०२६ रोजी ज्योती आपल्या माहेरी माळशेंद्रा येथे परतल्या आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
ज्योती पगारे यांच्या फिर्यादीवरून पती संतोष प्रकाश पगारे, भाया अंकुश प्रकाश पगारे, जाऊ सोनाली अंकुश पवार, दीर धम्मदीप प्रकाश पगारे आणि जाऊ वैशाली धम्मदीप पगारे (सर्व रा. नळणी बुद्ध, ता. भोकरदन) यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.