केशर आंबा pudhari photo
जालना

Kesar Mango Cultivation|केशर आंबा लागवडीत मराठवाड्याला उज्ज्वल संधी

डॉ. भगवान कापसे : भायगव्हाण येथे शेतकरी मेळावा

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी - मराठवाड्यातील हवामान केशर आंबा लागवडीसाठी अत्यंत पोषक असून आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापन आणि जलसंधारणाचा प्रभावी वापर केल्यास आंबा उत्पादनात मोठी वाढ साधता येऊ शकते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीकडे वळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन निवृत्त शास्त्रज्ञ तथा महाकेशर संघाचे सचिव डॉ. भगवानराव कापसे यांनी केले.

कृषी विभाग, सह्याद्री समाज महाराष्ट्र आणि ग्रामपंचायत भायगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळेत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रारंभी उपसरपंच सुनील कोरडे यांनी लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या पाझर तलावासह गावातील विविध विकासकामांची माहिती दिली.

यावेळी अंबड येथील सहायक कृषी अधिकारी तथा मॅटर अशोक सव्वाशे यांनी बदलत्या हवामानामुळे कापूस व सोयाबीन पिकांसमोरील आव्हानांचा आढावा घेत आधुनिक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

उपकृषी अधिकारी किरण घादगिने यांनी कृषी विभागाच्या विविध अनुदान योजना, नावीन्यपूर्ण उपक्रम व शेतकरी कल्याणकारी योजनांची माहिती दिली. यावेळी सहायक कृषी अधिकारी ए. एस. टी. गायकवाड, दीपक जाधव, ग्रामविकास अधिकारी एस. आर. घोडके, त्वरिता उत्पादक कंपनी व त्वरिता फाऊंडेशनचे ज्ञानेश्वर पघळ, आचार्य रूपतीतानंदजी स्वामी, कैलास कोल्हे, मुख्याध्यापक तुकाराम मोटे, प्रल्हाद ऐसलोटे (पोलिस पाटील), तुकाराम कोरडे, श्रीकिसन ऐसलोटे, शिवाजी बोबडे आदी शेतकरी उपस्थित होते.

आंब्याची हेक्टरी उत्पादकता

केवळ ४ टन मराठवाड्यात आंब्याची हेक्टरी उत्पादकता सध्या केवळ ३ ते ४ टन आहे. ब्राझीलमध्ये ही उत्पादकता ४५ ते ५० टन, तर दक्षिण आफ्रिकेत ३० ते ३५ टनांपर्यंत पोहोचली आहे. मराठवाड्यातही हेक्टरी ८ ते १० टन उत्पादन घेणे शक्य आहे. हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे डॉ. कापसे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT