वडीगोद्री : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (दि.२९) सायंकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. अंतरवाली सराटीत दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईला आंदोलन करणार आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांनी यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्री रामदास आठवले यांना दिले असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करणार आहेत.
यावेळी बोलताना मंत्री आठवले म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून अनेक प्रश्न सुटले आहेत. अजून काही प्रश्न बाकी आहेत ते सुटावेत, अशी अपेक्षा आहे. मागील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री इतर नेत्यांबरोबर मी सुद्धा येथे भेट देऊन चर्चा केली होती. राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. परंतु, जरांगे-पाटील यांना शंका आहे ते टिकेल की नाही. कुणबी नोंदीच्या माध्यमातून काहींना आरक्षण मिळाले, परंतु अजूनही ज्यांच्या नोंदी सापडत नाही त्यांच्यासाठी हैदराबाद, सातारा ,बाम्बे संस्थानचे गॅझेट लागू करावे. २९ ऑगस्टपर्यंत जरांगे यांनी आरक्षण देण्याची जी मागणी केली आहे, ती मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भुमिका मांडणार आहे, असेही मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मराठा समाजातील गोर-गरीब मुलांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आरक्षण द्या, अशी मागणी मी पहिल्यांदा केली होती, असेही मंत्री आठवले यावेळी म्हणाले.