शहागड; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे – पाटील यांनी मराठा गाठी – भेटीचा १२ दिवसांचा राज्यव्यापी दौरा सुरू केला होता. ३० सप्टेंबरपासून या दौऱ्याला सुरूवात झाली होती. आज गुरूवारी (दि.१२) या राज्यव्यापी दौऱ्याचा समारोप झाला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीनंतर जरांगे – पाटील यांनी अंबड येथे सभा घेतली. त्यानंतर ३० सप्टेंबरपासून १२ दिवस त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला. आज (दि.१२) पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी या दौऱ्याचा समारोप करून अंतरवाली सराटी येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी गावात फुलांची उधळण करत जारांगे – पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनतर गावातील माहिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी गावातील रस्ते रांगोळीसह फुलांनी सजवण्यात आले होते.
१४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे जरांगे – पाटील यांची सभा होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्यात आहे. सभेसाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सभेला येणाऱ्या सर्व मार्गावर चहा – नाष्टा व फ्रुट वाटपाची व्यवस्था मराठा समाज बांधवांसह सामाजिक संस्थांकडून करण्यात आले आहे. तसेच अंबड शहरात रात्री मुक्कामी राहण्याची तसेच जेवणाची देखील मारवाडी समाजाच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे.