Maratha protesters attempt to attack Adv. Sadavarte's vehicle
जालना शहरात मराठा बांधवांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सदावर्ते हे जालना शहरात आलेले असताना काही मराठा बांधवांनी त्यांच्या वाहनावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसही त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांची नजर चुकवून मराठा बांधवांनी गुणरत्ते यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न केला.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी जालना शहरात बोऱ्हाडे यांच्यासह काही जण उपोषण करत आहेत. उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी सदावर्ते हे वाहनातून चालले होते. याचवेळी काही मराठा बांधवांनी त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. सदावर्ते यांच्या वाहनापुढे पोलिसांचेही एक वाहन होते. तसेच पोलिसांनी सदावर्ते यांच्या जाण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी बंदोबस्तही तैनात केला होता.
पोलिसांना सदावर्ते यांना अडविण्याचा किंवा त्यांच्या हल्ला होण्याचा प्रयत्न होऊ शकतो, याची माहिती पोलिसांना मिळाली असण्याचा अदाज आहे. त्यामुळे सदावर्ते वाहन जाणार असलेल्या मार्गावर मराठा बांधवांना रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एके ठिकाणी सदावर्ते यांच्या वाहनापुढे असलेले पोलिसांचे वाहन थांबले आणि मराठा बांधवांना अडविण्याचा प्रयत्न केला.सदावर्ते यांचे वाहन त्याठिकाणी येताच काही मराठा बांधवांनी पोलिसांची नजर चुकवून वाहनाकडे धाव घेत हल्ल्याचा प्रयत्न केला. वाहनाच्या काचांवर त्यांनी हाताने प्रहार केला. अचानक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कार्यकर्त्यांना पकडले आणि वाहनाला वाट मोकळी करून दिली. दरम्यान, मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान सदावर्ते यांनी त्यांना डिवचणारी विधाने केली होती. आंदोलनाविरोधातही त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाच्या आदेशामुळे आंदोलनावर काही बंधने आली होती. त्यामुळे जालन्यात आलेल्या सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.