वडीगोद्री : मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करावे. एकजुटीने आपल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला आपला हिसका दाखवावा. मराठा समाज माझे ऐकत जरी असला तरी विधानसभा निवडणुकीत मी समाजास बंधनमुक्त केले आहे. असे म्हणत मी या आरक्षणाच्या लढाईत मरून जाईन, असे भावनिक वक्तव्य आज (दि.१२) मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले. तसेच पुन्हा अंतरवाली सराटी येथे सामूहिक आमरण उपोषण होणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. ते अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, या विधानसभा निवडणुकीबाबत समाजाला संकेत दिले असून कोणीही संभ्रम ठेऊ नका. माझा समाज जरी माझ्या ऐकण्यात असला तरी, मी माझ्या समाजाला बंधनमुक्त केले आहे. तुम्हाला ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा, असे मराठ्यांना सांगितल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधलेला किंवा विकला गेलेला समाज नाही, त्यामुळे ते जो निर्णय घेतील, तो योग्यच असेल असेही ते म्हणाले.
आता आम्ही अंतरवाली सराटी येथे सामूहिक आमरण उपोषणची तयारी करत असून सामूहिक आमरण उपोषणाची तारीख आपण सरकार स्थापन झाल्यावर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.