पांगरी : मंठा तालुक्यातील वाई शिवाराच्या उत्तर सीमेवर डोंगराच्या कडेला असलेल्या प्रसिद्ध कामाक्षी देवी मंदिराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नवरात्रोत्सवात भाविक भक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शंभू महादेव फाटा येथून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पक्का रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी वाई, पांगरी गोसावी, काकडा व परिसरातील भाविकांकडून करण्यात येत आहे.
कामाक्षी देवी मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्त येथे येतात. मात्र, मंदिराकडे जाण्यासाठी केवळ कच्चा रस्ता असल्याने भाविकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिला भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचताना अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शंभू महादेव फाटा ते कामाक्षी देवी मंदिरापर्यंत पक्का रस्ता होणे गरजेचे असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.
कामाक्षी देवी मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि परिसरातील नैसर्गिक वैशिष्ट्य लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच आगामी जिल्हा परिषद सदस्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शंभू महादेव फाटा ते कामाक्षी देवी मंदिरापर्यंत पक्का रस्ता करण्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी होत आहे.
दुष्काळातही वाहतोय झरा!
कामाक्षी देवी मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरासमोर असलेला नैसर्गिक पाण्याचा झरा. मंदिरासमोर अवघ्या तीन फूट खोलीचा हा झरा असून, भीषण दुष्काळी परिस्थितीतही त्यातून खळखळ वाहणारे पाणी हे विशेष आकर्षण ठरत आहे. या झऱ्याच्या पाण्यावर भाविक भक्तांसह परिसरातील वन्यप्राणीही आपली तहान भागवतात. त्यामुळे हा झरा कामाक्षी देवीचे विशेष वैशिष्ट्य मानला जातो.