मंठा : जालना जिल्ह्यातील मंठा शहरात भरदिवसा ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या गाडीवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना घडली आहे. केंधळी येथील रहिवासी व ट्रॅव्हल्स चालक प्रल्हाद श्रीमंतराव सिरसाट (वय 48) यांनी याबाबत मंठा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी दुपारी 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास एक काळ्या रंगाची बिना नंबरची स्कॉर्पिओ काही वेळ सिरसाट यांच्या ऑफिससमोर थांबून निघून गेली. त्यानंतर सुमारे 3.40 वाजता ट्रॅव्हल्सचालक केशव मिसाळ यांनी फोनवरून माहिती दिली की, विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयासमोर उभी असलेल्या एमएच 46,सी यू 4400 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, एमएच20, एएस 5499 क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ गाडी येऊन त्यातून दोन अज्ञात व्यक्ती खाली उतरल्याचे दिसून आले. त्यापैकी एकाच्या हातात लोखंडी कोयता होता. त्यांनी गाडीच्या समोरील मोठी काच दगड व कोयत्याने फोडून सुमारे 90 हजार रुपयांचे नुकसान केले. याच दरम्यान, शेजारी उभी असलेल्या महालक्ष्मी ट्रॅव्हल्स (एनएल 01, बी 1813) या गाडीच्या दोन जुन्या बॅटऱ्या, ज्यांची किंमत सुमारे 25 हजार रुपये आहे, त्या अज्ञातांनी चोरून नेल्या असल्याचे उघड झाले.