विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ करणार : मनोज जरांगेंचा इशारा Pudhari Online
जालना

Maharashtra Assembly Polls : विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ करणार : जरांगे

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री : आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षण मिळेल, ही अपेक्षा फोल ठरली. मराठ्यांना डिवचण्यासाठी ओबीसींत इतर जातींचा समावेश केला. आता त्यांना मते द्यावयाची की नाही, हे आमच्या हातात आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला.

निवडणूक जाहीर होताच जरांगे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचे काम फडणवीस यांनी केले. फडणवीस द्वेषाने वागले, असा आरोप त्यांनी केला. फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला. आता विधानसभेत त्यांची जिरवायचीच, लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.

आता कुणाच्या जागा वाढवायच्या आणि कुणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू, शेवटचे सांगतोक, प्रतिष्ठेची लढाई आहे. या राज्यात एक बाप आणि माय नाही की तिला वाटत नाही की आपलं पोरगं मोठं व्हावं. एक भाऊ नाही की त्याला वाटत नाही बहीण मोठी होऊ नये. प्रत्येक माय-बापाला मुलं मोठी व्हावी वाटत असतात. आपला अपमान केला. आपल्याला हिणवलं. आपल्याला खुत्रस म्हणून इतर १७ जाती ओबीसीत घातल्या. आपल्याला चॅलेंज आहे. आपल्याला ते आरक्षण देणार नाही. त्यामुळे तुम्ही ठरवा आता तुम्हाला जात मोठी करायची, मुलगा मोठा करायचा की जातीचा आमदार मोठा करायचा, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस आम्हाला आरक्षण देतील, असा आम्हाला विश्वास होता. शेवटी बरबटलेले विचार त्यांनी बाहेर आणलेच. मराठ्यांना बाजूला ठेवण्यासाठी फडणवीस यांनी डाव रचला. त्यांच्या १७ पिढ्या आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेवून ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी आपल्या समाजाला बळ द्यायचं काम करा. यावेळी मराठ्यांचे १०० टक्के मतदान झाले पाहिजे. मराठ्यांचे एकही मतदान घरी राहता कामा नाही, असे सांगितले.

उदय सामंत-जरांगे चर्चा

सोमवारी मुख्यमंत्री कुंभार पिंपळगाव येथे होते. त्यांच्यासोबत असणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रात्री अडीच वाजता जरांगे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. जवळपास दोन तास चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे उपस्थित होते. माजी खासदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी जरांगे यांची भेट घेतली.

अशी लाट पुन्हा येणार नाही

आता लोकसभेपेक्षा जास्त ताकत दाखवा. आपल्या प्रतिष्ठेची वेळ आलीय. अशी लाट पुन्हा येणार नाही, यावेळेस ताकत दाखवावी लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा कार्यक्रम लावला. ज्या मराठ्यांनी १०६ आमदार दिले, त्याच मराठ्यांवर तो उलटला. यावेळी मतं विकू देऊ नका. ते योग्य ठिकाणी वापरण्याचे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT