अंबड (जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित व्हायरल ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्यासाठी पडद्यामागून नियोजन सुरू असल्याची कुजबूज कानावर आली आहे. मात्र, कितीही प्रयत्न झाले तरी यातील मूळ सत्य आपण समाजासमोर आणणारच, असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या तपासात सत्याच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी अंकुशनगर (ता. अंबड) येथील पत्रकार परिषदेत केले.
जरांगे म्हणाले की, हे प्रकरण समोर आल्यापासून काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ही क्लिप १०० टक्के खरी असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता ती एआयच्या माध्यमातून तयार केल्याचा बनाव रचून एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का? क्लिपच्या सत्यतेबाबत निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे. फडणवीस, शिंदे यांच्यावर आपण अजूनही विश्वास ठेवला आहे. मात्र, केवळ सत्तेत एकत्र राहण्यासाठी जर एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घातले जात असेल, तर ते योग्य नाही. या ऑडिओ क्लिप प्रकरणात आमदार प्रसाद लाड किंवा संजय राऊत यांचा कोणताही संबंध नसून आपल्याकडे माहितीचे वेगळे स्रोत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजातील नेते असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले. मात्र, आज त्यांच्याकडूनच मराठा समाजाला त्रास सहन करावा लागत असेल, तर ही शोकांतिका आहे.