Manoj Jarange Patil | जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.  file photo
जालना

सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्हीच, मग अडचण काय? जरांगेंचं आजपासून पुन्हा उपोषण

Manoj Jarange Patil | सगेसोयरे अधिसूचनेला उद्या एक वर्ष पूर्ण

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Manoj Jarange Patil Maratha reservation protest | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारविरोधात आंदोलनाचे शस्त्र उचलेले आहे. सगेसोयरे कायद्याच्या अधिसूचनेला उद्या २६ जानेवारी रोजी एक वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.

आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्हीच मग आता काही अडचण नाही. तुमची मराठ्यांविषयीची भावना काय आहे, हे सगळं राज्य बघणार आहे. खरे जातीयवादी कोण हे राज्याला समजेल, मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या मागण्यांची ताबडतोब अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

जरांगे यांच्या मागण्या काय?

मराठा समाजाला न्याय द्यायला सरकारला एक वर्ष लागत का? सरकारला मराठा समाजाची जाण नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे, सगे सोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी. आधी स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरू करावेत. काही जातीयवादी अधिकाऱ्यांनी नोंदी असलेले प्रमाणपत्र दिले नाही, ते प्रमाणपत्र तातडीने वितरित करावे. मराठा तरुणांवर दाखल असलेले गुन्हे मागे घ्यावे. सातारा संस्थान, बॉम्बे गर्व्हमेंट, हैदराबाद संस्थानचे गॅझेट मुख्यमंत्र्यांनी तातडीने लागू करावेत. ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाला अजून निधी मिळालेला नाही, त्यांना निधी देऊन एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशा मागण्या जरांगे पाटील यांनी सरकारकडे केल्या आहेत.

संतोष देशमुखला न्याय मिळण्यासाठी लढणार

सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. गुंडांच्या टोळीचा सरकारने नायनाट करावा. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे यांना न्याय मिळावा, यासाठी लढणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठ्यांविषयी कोणाच्या मनात विष

सरकारला मराठ्यांच्या मागण्या माहिती आहेत, मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी. मराठ्यांशी मुख्यमंत्री बेइमानी करणार नाही याची खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी जाणीव ठेवावी. हे सामूहिक उपोषण आहे. ज्याला बसायचं त्याने बसावं. कोणावरही जबरदस्ती नाही. आमच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी तातडीने अंमलबजाणी करावी. गोरगरीब मराठ्यांच्या मुलांचे दुःख वाटून घ्या, समजून घा. सरकारकडून कोणतीही विचारपूस नाही, काहीच बोलणं नाही. मुंबईतील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे. ही लढाई सुरू राहणार, कोणताही विषय मागे राहणार नाही. आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्हीच मग आता काही अडचण नाही. तुम्ही मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. तुमची मराठ्यांविषयीची भावना काय, हे सगळं राज्य बघणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात मराठ्यांविषयी आकस, द्वेष असेल तर ते मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत. मराठ्यांशिवाय सत्तेत बसू शकत नाहीत. मराठ्यांनी त्यांना सत्तेत बसवलं. कोणाच्या मनात मराठ्यांविषयी विष पेरलं आहे हे आता आम्हाला बघायचं आहे, असेही जरांगे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT