Manoj Jarange Patil hunger strike pudhari photo
जालना

Manoj Jarange Patil hunger strike : उपोषणाचा तिसरा दिवस; शुगरच्‍या रिपाेर्टबाबत मनोज जरांगेंना शंका

उपाशी असताना साखर वाढली कशी?; सोक्षमोक्ष लावा, माध्यमांनाच आवाहन

पुढारी वृत्तसेवा

वडिगोद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला आहे. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती ढासळत असल्याने वैद्यकीय पथकाकडून दररोज नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. मात्र, डॉक्टरांनी सादर केलेल्या शुगर (साखरेची पातळी) रिपोर्टबाबत स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शंका व्यक्त केली आहे.

उपोषणाच्या पहिल्या दिवशी शरीरातील साखरेची पातळी 94 होती, ती दुसऱ्या दिवशी थेट 66 पर्यंत खाली आली. परंतु, त्यानंतर काहीही न खाता-पिता हीच पातळी अचानक वाढून आधी 72 आणि नंतर 80 वर कशी पोहोचली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष पत्रकारांनीच लावावा, असे थेट आवाहन त्यांनी माध्यमांना केले.

अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब आढळल्यास जीव देईन : जरांगेंचे थेट आव्हान

काहीही अन्न किंवा पाणी पोटात जात नसताना शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक कसे वाढू शकते, यावर जरांगेंनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. "मी राहते ठिकाण सोडून कुठेही जात नाही, तरीही साखरेची पातळी वाढल्याचे दाखवले जात आहे. माझ्या पोटात अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब जरी आढळला, तरी मी सांगाल तिथे प्राण सोडायला तयार आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. वैद्यकीय उपकरणांमध्ये किंवा प्रशासकीय अहवालांमध्ये काही गडबड आहे का, अशी शंका व्यक्त करत त्यांनी स्वतःची वैद्यकीय तपासणी इतर उपकरणांद्वारे किंवा माध्यमांसमोर करण्याची तयारी दाखवली आहे.

प्रकृतीबाबत चिंता वाढली; वैद्यकीय पथक सतर्क

उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने जरांगे यांच्या प्रकृतीबाबत राज्यभरातील समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अन्नाचा त्याग केल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे आणि साखरेचे प्रमाण अनियंत्रित होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, अहवालातील या अचानक झालेल्या बदलांमुळे हा विषय आता केवळ आरोग्यापुरता मर्यादित न राहता गंभीर वादाचा विषय बनला आहे. एकीकडे आंदोलन अधिक तीव्र होत असताना, दुसरीकडे जरांगे यांनी वैद्यकीय अहवालांवरच शंका उपस्थित केल्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली असून वैद्यकीय पथकाकडून अधिक बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT