आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात मका काढणीला वेग आला आहे. (छाया: सादिक शेख) 
जालना

Jalna maize harvesting|मका काढणीला वेग; उत्पन्न कमी, खर्च जास्त !

उत्पादन घटले चिंतेत; मजुरी व काढणीचा खर्च वाढल्याने आर्थिक गणित बिघडले

पुढारी वृत्तसेवा

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात मका पिकाच्या काढणीला वेग आला असून शेतकरी सध्या काढणी आणि मळणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. शेतांमध्ये मका काढणीची लगबग सुरू असली, तरी अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसून येत आहे. एकीकडे शेतीसाठी वाढता खर्च आणि दुसरीकडे कमी उत्पादन, अशा दुहेरी संकटामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मका हे परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी दुसरे महत्त्वाचे पीक मानले जाते. खरीप हंगामात मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. इतर पिकांच्या तुलनेत मका पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने शेतकरी बियाणे, खते आणि औषधांवर खर्च करतात. मात्र, प्रत्यक्ष उत्पादन हाती येण्याची वेळ आल्यानंतर अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, तर संपूर्ण हंगामाचे आर्थिक नियोजन कोलमडते. सध्या अशाच परिस्थितीचा सामना काही मका उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

यंदा मका पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना विविध खर्चाचा सामना करावा लागत आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी तसेच काढणी व मळणीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. प्रत्यक्षात उत्पादन कमी मिळाल्यास या खर्चाची भरपाई करणे शेतकऱ्यांसाठी कठीण ठरत आहे. सध्या अनेक शेतांमध्ये मका काढणीची कामे सुरू असून काही ठिकाणी यंत्रांच्या साहाय्याने मका वेगळा करण्याचे काम केले जात आहे. शेतात मक्याचे ढीग दिसत असले, तरी उत्पादन आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

मका पिकासाठी केलेला खर्च, मिळणारे उत्पादन आणि बाजारात मिळणारा दर यावरच शेतकऱ्यांच्या नफ्याचे गणित अवलंबून आहे. उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न शिल्लक राहणे कठीण होणार आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने पिकाची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

संकट उभे राहण्याची शक्यता

एकीकडे शेतात मका काढणीची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे कमी उत्पादन आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मका पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळणार का आणि शेतीचा खर्च भरून निघणार का, हा प्रश्न सध्या मका उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT