जालना : जालना एसटी महामंडळाच्या जालना विभागातील चार आगारातून आषाढीनिमित्त पंढरपूर येथे वारकरी व भक्तांसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमधून जालना एसटी विभागाला २ कोटी ४ हजार ५ रुपयांचे उत्पन्न झाले. गतवर्षीच्या तुलनेत जालना विभागाच्या उत्पन्नात ५६ लाख १४ हजार ६२१ रुपयांची वाढ झाली आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे. यंदादेखील या उत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या गर्दीचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाने आपल्या सेवांचे नियोजन अचूकपणे केले. विशेष बसेसच्या व्यवस्थेसह, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयींसाठी विशेष काळजी घेण्यात आली. या नियोजनामुळे भाविकांना कोणत्याही तक्रारीशिवाय प्रवास करता आला.
जे भाविक पायी पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी एस.टी. धावून आली. लाखो भाविक व वारकऱ्यांना एसटीने त्यांना विठुरायाचे दर्शन घडवून आणले एसटीच्या जालना विभागातील जालना, परतूर, जाफराबाद व अंबड या चार आगारांतून पंढरपूर येथे आषाढीनिमित्त सोडण्यात आलेल्या जादा बसेसने या वर्षी १ हजार ७० फेऱ्या करून ६५ हजार ८२० वारकरी व भक्तांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडविले. एकाच ठिकाणाहून चाळीसपेक्षा अधिक प्रवासी असल्यास एसटी महामंडळाने त्या गावातून बस सोडण्याची व्यवस्थाही या निमित्त केली होती. गतवर्षी एसटी महामंडळाच्या जालना विभागाने ८१८ फेऱ्या करून ५३ हजार ९५ वारकरी व भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घडविले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महामंडळाच्या बसेसनी २५२ फेऱ्या अधिक केल्या आहेत. जालना विभागाला गतवर्षी पंढरपूर यात्रेतून १ कोटी ४५ लाख ८९ हजार ३८४ रुपयांचे उत्पन्न झाले होते. यावर्षी त्यात ५६ लाख १४ हजार ६२१ रुपयांची वाढ झाली आहे. एसटी महामंडळातील चालक-वाहकांसह सर्वच कर्मचाऱ्यांनी आषाढीसाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसह वारकऱ्यांसाठी केलेल्या एकत्रीत प्रयत्नामुळे हे उत्पन्न मिळाले आहे.
जालना विभागातील जालना, परतूर, अंबड व जाफराबाद या चार आगारांतून दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूर येथे एसटी बसने जातात. या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तत्पर असतात. यामुळेच पंढरपूरला दरवर्षी एसटीने जाणाऱ्या वारकऱ्यांसह भक्तांची संख्या वाढत आहे.