वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू आणि दलित नेत्यांसोबत आज (दि. ३१) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम, दलित, मराठा समीकरणावर एकमत झाले आहे. मराठा, दलित आणि मुस्लीम एकत्र आले आहेत. एवढंच नाही तर बंजारा समाज आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या बैठकीस मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे कार्यकारणी सदस्य सज्जाद नोमानी, मौलाना जहीर अब्बास रिझवी, ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड चे वरिष्ठ उपाध्यक्ष, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर, डॉ. अझीमुद्दीन सय्यद, अंजार अन्वर खान, राष्ट्रीय सरचिटणीस ऑल इंडिया उलामा बोर्डाचे मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना अब्दुल मजीद शेख, मुफ्ती नईम, मोहसीन शेख, मुजतबा फारूक, खा. चंद्रशेखर आझाद यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जरांगे पुढे म्हणाले की, परिवर्तनासाठी दलित- मुस्लिम - मराठा एकत्र आले आहेत. आम्ही आता सगळ्या प्रश्नांवर एकत्र आलो आहोत. कोणते मतदार संघ आणि उमेदवार कोण याची घोषणा 3 नोव्हेंबरला करणार आहे. आम्ही लोकशाही मार्गाने उभे राहतोय, आमच्यावर कुणीही ददागिरी करू नये. आमच्यावर गुंडगिरीचे प्रयोग करायचे नाहीत, आमचे काम 4 तारखेपासून सुरू होणार आहे. आरक्षणाला आम्ही सरकारला लागत नाही, आम्ही धर्म परिवर्तन नाही, तर सत्ता परिवर्तन करण्यासाठी एकत्र आलो आहे. लिंगायत, बंजारा, धनगर, महानुभाव पंथाच्या बांधवांनीही आमच्याकडे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिथे मराठा उमेदवार उभे राहतील, तिथे दलित मुस्लिम मतदान करणार आहेत. जिथे दलित उमेदवार आहेत. तिथे मराठा, मुस्लिम मतदान करतील. आणि जिथे मुस्लिम उमेदवार असेल, तिथे मराठा आणि दलितांनी ताकदीने मतदान करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. आम्ही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सभा घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
सज्जाद नोमाणी म्हणाले की, आम्ही एक अशी वज्रमूठ बांधली आहे की, ज्यामुळे राज्यातील राजकारण बदलणार आहे. अदानी अंबानी यांच्यावर कोट्यवधी कर्ज आहे. पण वसुली लहान कर्जदारांकडून सुरू आहे. गरिबांना सत्तेत बसवणे हेच आमचे ध्येय आहे.
आनंदराज आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात मराठा समाजाला आरक्षणाची तरतूद केली. पण तेव्हा काही जणांनी विरोध केला. प्रत्येक समाजाच्या मागण्या सत्तेत येऊन आम्ही मान्य करायच्या या हेतूने आम्ही एकत्र आलो आहोत.
प्रस्थापित लोक उमेदवारी मागण्यासाठी इकडे येत आहे. आताच राजकारण काही जणांची मक्तेदारी झालीय आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलण्याचे काम जरांगे यांनी केले. आमच्या प्रयत्नाला आता यश आले आहे. ही मैत्री आता देशभरात जाईल. आमच्या बाजूने बोलणारे प्रतिनिधी आता विधानसभेत पाठवायचे आहेत, असे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.