'Loot' of 10 lakh brass of murrum for the Jalna-Nanded Samruddhi Expressway
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या कामात तब्बल १० लाख ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभा अधिवेशनात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत थेट जिल्हा प्रशासनालाच धारेवर धरले. "अवैध उत्खनन करणाऱ्या गुत्तेदाराला खुद्द जिल्हाधिकारीच पाठीशी घालत आहेत," असा थेट आणि गंभीर आरोप लोणीकर यांनी सभागृहात केला.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा पुराव्यासह उपस्थित केला. ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे काम जालना, परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यांतून जात असून, सध्या परतूर मतदारसंघात हे काम वेगाने सुरू आहे. संबंधित गुत्तेदाराने केवळ ७८ हजार ८१५ ब्रास मुरुमाची रॉयल्टी (स्वामित्वधन) सरकारकडे भरली आहे.
मात्र, प्रत्यक्षात नियमांचे सर्रास उल्लंघन करत १० लाख ब्रासपेक्षा जास्त मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे. धरणाच्या भिंतीला खेटून २० फूट खोल अवैध खोदकाम परतूर मतदारसंघातील हेलसवाडी गावातील पाझर तलावाजवळ कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हे उत्खनन करण्यात आले. नियमानुसार धरणाच्या किंवा तलावाच्या भिंतीपासून २०० फूट जागा सोडणे बंधनकारक असताना, गुत्तेदाराने थेट धरणाच्या भिंतीला खेटून तब्बल २० फूट खोल अवैध खोदकाम केले आहे.
याशिवाय शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीदेखील विनापरवाना उकरून टाकल्या आहेत. तहसीलदार, टीएलआर (भूमिअभिलेख) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या अवैध उत्खननाची मोजणी सुरू केली होती. मात्र, मोजणी पूर्ण झाल्यास गुत्तेदाराचे कोट्यवधी रुपयांचे पाप उघड होईल आणि शासकीय चोरी पकडली जाईल, याच भीतीने जिल्हाधिकाऱ्यांनी मोजणी थांबवण्याचे तोंडी आदेश दिले," असा घणाघाती आरोप लोणीकर यांनी केला.
अधिकाऱ्यांना नोटीस, पोलिसांची दिरंगाई
शेतकऱ्यांनी या अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेतली असून, कोर्टाने तहसीलदार, डेप्युटी इंजिनिअर आणि कार्यकारी अभियंता यांना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असूनही, अद्याप एकही वाहन जप्त करण्यात आलेले नाही किंवा संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही, याबद्दल लोणीकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला.