Leopard pudhari
जालना

Leopard movement in West Chinchkhed Jalna | पश्चिम चिंचखेड परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा, ग्रामस्थांमध्ये भीती

West Chinchkhed- पश्चिम चिंचखेड परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा, ग्रामस्थांमध्ये भीती

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील पश्चिम चिंचखेड परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांत दोन बकऱ्या व दोन कुत्रे मृतावस्थेत आढळल्यानंतर १४ सप्टेंबरच्या रात्री एका वासराचाही मृत्यू झाला. दरम्यान, शेतात फवारणीचे काम करणाऱ्या कामगाराला बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे.

पश्चिम चिंचखेड हे संत चोखामेळा जलाशय अर्थात खडकपूर्णा धरणालगतचे गाव आहे. परिसरात ऊस, कपाशी तसेच झाडे-झुडपे असल्याने वन्यप्राण्यांच्या वावराची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी नानासाहेब भास्करराव देशमुख यांच्या दोन बकऱ्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यानंतर परिसरात दोन कुत्रेही मृत आढळून आले. या घटनांमध्ये नेमका कोणत्या प्राण्याचा सहभाग होता, याबाबत स्पष्टता नसताना आता १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी शेतात फवारणी करणाऱ्या कामगाराला बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला.

कामगाराच्या म्हणण्यानुसार, बिबट्या दिसताच त्याने फवारणीचा पंप घटनास्थळी सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्याने शेतमालकाला याबाबत माहिती दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, त्याच रात्री परिसरातील एका वासराचा मृत्यू झाला. वासरावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत असला तरी त्याच्या मृत्यूमागे नेमका कोणता वन्यप्राणी किंवा अन्य कारण होते, हे अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसराची पाहणी करून मृत जनावरांच्या घटनांची तपासणी करावी, ठसे व अन्य पुरावे तपासावेत तसेच आवश्यक असल्यास कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याच्या वावराची खात्री करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. परिस्थितीची गरज लक्षात घेऊन वनविभागाने गस्त वाढवावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शेतात काम करणारे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता वनविभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी पश्चिम चिंचखेड ग्रामस्थांनी केली आहे.

मृत जनावरांच्या घटनांची वनविभागाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा. वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित पशुपालकांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी.
- चिंचखेड ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT